सांगली: प्लॉटस विक्रीसाठी नाहरकत दाखला देण्याच्या मोबदल्यात बारा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या कारकुनाला दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनाविण्यात आली.
वसंत दत्तात्रय मिरजकर (वय ५५, रा. कुची रोड, कवठेमहांकाळ) असे शिक्षा झालेल्या कारकुनाचे नाव आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले.
खटल्याची अधिक माहिती अशी की, सन २०१२ मध्ये हा प्रकार घडला होता. फिर्यादी प्रसाद वसंत मोहिते यांना त्यांची पत्नी पुनम आणि बहिण शुभदा यांच्या नावे असलेले तळेगाव दाभाडे योजनेतील प्लॉटस विक्रीसाठी नाहरकत दाखला हवा होता. हा दाखला मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कमाल जमीन धारणा विभागात अर्ज केला होता. त्यावेळी तेथे कार्यरत असलेला अव्वल कारकून आरोपी वसंत मिरजकर याने दाखला देण्यासाठी मोहिते यांच्याकडे पंधरा हजारांची मागणी केली. अखेर १२ हजार रुपयांवर तडजोड केली होती. मोहिते यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयीत वसंत मिरजकर यास लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.
तत्कालीन पोलीस निरीक्षक विजय सारभुकन आणि व्ही. डी. बाबर यांनी तपास करुन सांगली शहर पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात तत्कालीन जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. सरकारपक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्याला दोषी धरत आरोपी वसंत मिरजकर यास एक वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच अन्य कलमान्वये तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
0 Comments