कडा (बीड) - डेअरीवर दुध घालण्यासाठी गेलेला शेतकरी घरी परतला नसल्याची घटना मंगळवारी घडली होती.
आज दुपारी या शेतकर्याचा बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील दत्त मंदिराच्या बाजूला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहीदास नारायण खोटे (५०) वर्ष असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथील शेतकरी रोहीदास नारायण खोटे हे मंगळवारी सकाळी घरातून डेअरीवर दुध घालण्यासाठी गेले होते. परंतु ते घरी परतले नव्हते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते आढळून आले नाही. मात्र, आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान एक गॅरेज दुकानदार लघुशंकेसाठी गेला असता तेथे एक मृतदेह आढळून आला. त्याने याची माहिती कडा पोलिस चौकीला दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह खोटे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. तेथे एका विषारी द्रव्याची बॉटल सुद्धा आढळून आली. शेतकरी खोटे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली होती
दरम्यान, सोमवारी मध्यरात्री आळंदी येथील एकव्यक्ती तीनचार जणांना घेऊन आई-वडिल राहत असलेल्या कडा डोंगरगण रोडवरील घरी आले होते. यावेळी त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून वडील रोहिदास खोटे यांना अपमानित करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वडिल मंगळवारपासून गायब होते. यातूनच त्यांचे बरेवाईट झाल्याचा आरोप मृताचा मुलगा नागेश खोटे यांनी केला आहे.
0 Comments