तालुक्यातील प्रत्येक निवडणूक ताकदीने लढवू , उमेदवार म्हणून मी पराभवाची जबाबदारी स्वीकारतो : अनिल सावंत




मंगळवेढा : प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी उमेदवार म्हणून मी घेतो. कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही पदाधिकारी, पक्ष कमी पडला असे मी म्हणणार नाही.कुठलाही सहकारी कमी पडला नाही,  पक्षाने मला उमेदवारी दिली, त्यामुळे मी जबाबदारी घेतो.  येणारा काळ हा राष्ट्रवादीचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा असेल, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत  यांनी कार्यकर्त्यांना दिली. यावेळी माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, रतनचंद शहा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी आदी प्रमुख उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प. ) पक्षाची विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मंगळवेढा येथे विचारमंथन बैठक संपन्न झाली. यावेळी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, राहुल शहा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हि मनोगत व्यक्त केले. 

यावेळी पुढे बोलताना सावंत म्हणाले  कि, लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे जनता सोबत होती, तशीच जनतेची साथ यावेळी सुद्धा होती, लोकांनी आपल्याला मतदान केलेले आहे, दहा पैकी सात आठ लोकांनी तुतारीला मतदान करणार असल्याचे लोक बोलत होते. विधानसभा निवडणुकीतील हा पराभव कसा झाला, याबाबत अक्खा महाराष्ट्र हळहळतोय, पवार साहेबांचा पक्ष, उद्धव साहेबांचा पक्ष संपवण्याचे हे कारस्थान आहे, असे दिसते. दोन दिवसांपूर्वी पक्षाची बैठक झाली, त्यावेळी पक्षाने नव्या जोमाने पुढे जाण्याचे सांगितले आहे. आज जे वातावरण दिसते आहे, ते पुढील काळात नसेल, आपल्याकडून हा निकाल हिसकावून घेतला आहे, त्यांनी जिंकूनही आनंद साजरा केलेला नाही. आगामी निवडणूक आपण लढवणार आहोत. गावागावात आपण शाखांचे नियोजन करू, आपल्या सुख दुःखात अनिल सावंत, भैरवनाथ शुगर्स परिवार, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आपल्या सोबत असेल अशीही खात्री यावेळी सावंत यांनी दिली. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments